मुंबई : कंत्राटी पद्धतीने वाहन चालक घेण्याच्या विरोधात मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनने केलेल्या तक्रारीची दखल घेत कामगार उप आयुक्त यांनी येत्या 23 फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासन आणि युनियन सोबत अग्निशमन प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. ही बैठक वांद्रे येथील कामगार उप आयुक्त यांच्या कार्यालयात होणार आहे.
कंत्राटी पद्धतीने वाहन चालक घेण्याच्या विरोधात मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनने 15 फेब्रुवारी रोजी कामगार उप आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत संबंधितांना 18 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून 23 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीची माहिती कळविली आहे.
दरम्यान, स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत 54 वाहन चालक कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
आयुक्त इकबाल सिंह चहल यांना मुंबई फायर सर्व्हीसेसने पत्राद्वारे कळविले होते.
मुंबई फायर सर्व्हिसेसने वेळोवेळी कंत्राटी पद्धतीला विरोध करत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना 9 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र पाठवून मुंबई अग्निशमन दलात यंत्रचालक संवर्गाची अर्हता प्राप्त करणारे सुमारे 100 अग्निशामक जवान असून सदर कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहे. विहित वेळेत त्यांना पदोन्नती न दिल्याने त्यांचे खूपच आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तरी संवर्गाची पदे त्वरित न भरता कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याचा घाट घातल्याचा उल्लेख केला होता. मात्र हे गैर आणि बेकायदेशीर असून सेवाशर्ती मध्ये बदल करण्यापूर्वी सदर बदलाची नोटीस संबंधित कर्मचाऱ्यांना वा त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या संघटनाना देणे कायद्याने बंधनकारक असताना देखील सदर नोटीस देण्यात आलेली नाही, हा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रशासनाची ही कृती एकतर्फी व बेकायदेशीर तसेच औद्योगिक कलह कायदा 1947 च्या विविध कलमांचा भंग करणारी आहे.
मुंबई अग्निशमन दलात 300 हून अधिक अग्निशमन जवांनाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना आहे. या सर्वांना ऑक्टोबर 2020 मध्ये अडीच वर्षे पूर्ण झालेली आहेत. एप्रिल 2021 मध्ये संबंधित कर्माचाऱयांची नियमित सेवा 3 वर्षे होत आहे. ही बाब लक्षात घेता तसेच यंत्रचालक पदावर नियुक्ती करिता अग्निशामक पदावरील 5 वर्षे सेवेची अट शिथिल करून, ती अट अडीच वर्षे करण्यात आलेली आहे ही बाब लक्षात घेता यंत्रचालक संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, असेही नमूद करण्यात आलेले आहे.
कंत्राटी पद्धतीमागे काही अधिकाऱ्यांचे हित लपलेले असल्याचा आरोप होत असून ही बाब गंभीर असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी ही युनियनने केली आहे.
आयुक्त इकबाल सिंह चहल यांना मुंबई फायर सर्व्हीसेसने पाठवलेले पत्र
टिप्पणी पोस्ट करा