![]() |
आमदार रविंद्र वायकर |
*- कोर्लाई व महाकाली येथील जागे प्रकरणी करण्यात आलेले खोटे आरोप
*- खोट्या प्रकरणी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा आरोप
*- माफी न मागितल्यास पुढील सिव्हील व क्रिमिनल कारवाई करण्याचा नोटीसीद्वारे इशारा
मुंबई, दि. १३: कोलाई व महाकाली येथील जागेच्या खोट्या प्रकरणी बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याप्रकरणी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. या नोटीसीनुसार सोमैय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील सिव्हील व क्रिमिनल कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
काही महिन्यांपुर्वीच किरीट सोमैय्या यांनी सौ. मनिषा रविंद्र वायकर तसेच सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच वरील माहीती निवडणुक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी (एका बंगल्याची किंमत रुपये ५ कोटी आहे.) केल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला. परंतु यावेळी त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नव्हते. त्याचबरोबर महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून रुपये २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी खोटया प्रकरणी आरोप करीत वायकर, त्यांचे कुटुंब तसेच पक्षाची नाहक बदनामी तर केलीच, जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमाही मलिन केली.
यातील कोर्लाई जमिन प्रकरणी सोमैय्या यांच्या आरोपांची काही विविध प्रसारमाध्यमांनीच पोलखोल केली. परंतु मार्च महिन्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सोमैय्या यांनी महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी पुन्हा वायकर यांच्यावर खोटे आरोप करीत जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा जाणुन बुजुन प्रयत्न केला. सातत्याने बिनबुडाचे आरोप करीत नाहक आपली, कुटुंबाची तसेच पक्षाची बदनामी करणार्या सोमैय्या यांना अखेर रविंद्र वायकर यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीत सोमैय्या यांनी कुठलेही सबळ पुरावे न देता केलेले आरोप जाहीररित्या मागे घेत जाहीर माफी न मागितल्यास पुढील सिव्हील व क्रिमिनल कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी या नोटीसीद्वारे दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा