मुंबई दि.८ : गेल्या एक वर्षांपासून मुंबईत ठाण मांडलेल्या कोरोनाने आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या १९१ अधिकारी व कर्मचारी यांचा बळी घेतला आहे. त्यापैकी ४६ अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. १३ जणांना केंद्रीय योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
तर उर्वरित १३२ कर्मचारी, अधिकारी यांच्या कुटुंबियांनाही लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र काही कारणास्तव व तांत्रिक बाबींमुळे या मृत अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी काहीसा विलंब होत आहे, हे खरे.
मुंबईत फेब्रुवारी अखेरच्या सुमारास कोरोनाचा प्रदूर्भाव सुरू झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रदूर्भावाढी लागला. प्रारंभी वरळी, भायखळा, नंतर धारावी आदी ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण झाले होते.त्यावेळी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची सरकारने तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी इकबाल चहल यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच प्रथम हॉटस्पॉट धारावी झोपडपट्टीमध्ये धावती भेट देऊन त्या ठिकाणी कडक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोना काहीसा नियंत्रणात आला. मात्र सरकारने लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणल्याने व लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना समयमर्यादेत प्रवास करण्यास मुभा दिल्याने आणि लग्न सराईचे कार्यक्रम वाढून त्यात मोठी गर्दी झाल्याने पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
दरम्यान, आपले कर्तव्य बजवताना पालिकेच्या १९१ अधिकारी व कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यामुळे या विषयावर खरमरीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा