मुंबई : विकलांग व्यक्तींचे हक्क, अधिनियम,२०१६ च्या कलम २ (२) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही महिला कर्मचारी किंवा पुरुष कर्मचारी (ज्याची पत्नी हयात नाही) यांना संपूर्ण सेवा कालावधीमध्ये तिच्या /त्याच्या अपंग /विकलांग अपत्याचे संगोपन करण्याकरिता वेतनासह ७३० दिवसांपर्यंत " बाल संगोपन रजा " च्या प्रस्तावाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका सभागृहात काल दिनांक (१६ मार्च २०२१) रोजी मंजुरी दिली आहे.
उपरोक्त नमूद केलेली विकलांगता/ विकृती ही अधिनियमानुसारच्या व्याख्येप्रमाणे असणे आणि सदर विकलांगता ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याबाबत वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे सदर प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
" बाल संगोपन रजा " अनुज्ञेय करण्याकरिता विकलांगतेबाबतचे जिल्हा दिवाणी शल्य चिकित्सक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने अथवा राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार जारी केलेले अपंगत्वाकरिताचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच "बाल संगोपन रजा" हक्क म्हणून दावा करता येणार नाही. सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व मान्यतेनेच सदर रजेचा लाभ घेता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. "बाल संगोपन रजा" विकलांग अपत्याच्या वयाच्या २२ वर्षापर्यंत अनुज्ञेय राहील. "बाल संगोपन रजा" हयात असलेल्या पहिल्या दोन अपत्यांकरिता लागू राहील. विशेष बाल संगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्यापूर्वी जेवढे वेतन प्राप्त होत असेल तेवढेच वेतन रजा वेतन म्हणून देण्यात येईल.
विशेष बाल संगोपन रजेची नोंद सेवा अभिलेख नस्तीमध्ये करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे परिविक्षाधीन
कालावधीमध्ये "बाल संगोपन रजा" मंजूर करता येणार नाही. तथापि, अपत्याच्या गंभीर परिस्थितीमुळे रजा घेणे आवश्यक असल्यास याबाबत रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांचे समाधान झाल्यास, परिविक्षाधीन कालावधीमध्ये अपवादात्मक परिस्थितीत किमान कालावधीची " बाल संगोपन रजा " मंजूर करण्यात येईल आणि तत्सम प्रमाणात त्या कालावधीकरिता सदर कर्मचार्याचा परिविक्षाधीन कालावधी विस्तारित करण्यात येईल.
या बाबतीत महिला/ पुरुष कर्मचाऱ्यांची जरी एका विभागांमधून दुसऱ्या विभागांमध्ये बदली करण्यात आली तरी सेवेच्या एकूण कालावधीमध्ये सदर कर्मचारी ७३० दिवसांच्या "बाल संगोपन रजेकरिता " पात्र असेल. कोणत्याही अन्य रजेकरिता अर्ज केल्यास, सदर रजा विशेष बाल संगोपन रजेला जोडून घेता येईल. मात्र अशा कोणत्याही रजेचा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असणार नाही. विकलांग अपत्य प्रस्तुत कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱ्यांने सादर करणे आवश्यक आहे.
********
टिप्पणी पोस्ट करा