मुंबई : मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य शासनाने कोविड-१९ ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. त्याअनुषंगाने वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या "शरद पवार अकादमीला" मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दि. १८ मार्च २०२१ रोजी भेट देऊन कोविड-१९ च्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, याठिकाणी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. अजय देसाई उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर संबंधित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या की, आपण या अकादमीमध्ये केलेली व्यवस्था ही सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणारी आहे. आपण एका टेबलानंतरचा एक टेबल हा फक्त टेडीबियरसाठी आरक्षित करून या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना चांगला सकारात्मक संदेश दिला आहे. जेणेकरून टेडीबियर ठेवलेल्या ठिकाणी कोणीही बसणार नाही. यातून ५०% क्षमतेच्या नियमांचे पालन होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे महापौर म्हणाल्या. कोरोना सोबतची आपली लढाई सुरू असताना सामाजिक अंतर पाळून आपण कश्याप्रकारे काळजी घेत आहे, हे यातून सिद्ध होत असल्याचे महापौर म्हणाल्या. इतर सर्व हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा याच प्रकारची संकल्पना राबवून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.
****
टिप्पणी पोस्ट करा