मुंबई, दि.२१ : राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरण गाजत आहे. याच प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात आलेले परमवर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी यांनी सायन सर्कल येथील भाजप कार्यालयानजीक घोषणाबाजी व फलकबाजी करत उत्स्फूर्त आंदोलन केले.
यावेळी, पोलिसांनी आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे गृहमंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ठाकरे सरकारने सत्तेवरून आता तरी पायउतार व्हावे, अशी मागणी चित्रा वाघ व आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
याप्रसंगी, ' आता तरी हे स्पष्ट आहे, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे', ' गली गली मे शोर है, तिघाडी सरकार चोर है' , ' दर महिना १०० कोटी रुपये, वसुली सरकार हाय हाय', ' हे तर वसुली मंत्री, महाराष्ट्राला लुटणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाच पाहिजे' , असे फलक झलकावत भाजप नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करीत महाविकास आघाडी सरकरचा निषेध व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा