• *मुंबईत लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा*
• *त्यानंतर, दररोज १ लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट*
• *स्थानिक नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्थांच्या मदतीने लसीकरणाचा वेग वाढवणार*
• *सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना कोविड-१९ उपचारांसाठी येत्या ४८ तासांत पूर्वीप्रमाणे रुग्णशय्या वाढविण्याच्या सूचना*
• *खासगी रुग्णालयांनी शासकीय दरपत्रकाप्रमाणे देयक आकारावे, निरीक्षणासाठी महानगरपालिकेच्या लेखापरीक्षकांची पुन्हा नियुक्ती करणार*
• *मुंबईतील दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरुन टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्याचे लक्ष्य*
मुंबई : महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसेच शासकीय रुग्णालयांत लसीकरणाचा वेग अत्यंत चांगला असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण तुलनेने अत्यल्प आहे. लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही संख्या वाढताच दररोज किमान १ लाख याप्रमाणे ४५ दिवसांत ४५ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयाने दररोज किमान १ हजार पात्र नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह वेगवेगळ्या सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.
मागील काही दिवसांमध्ये सर्वत्र कोविड-१९ रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील कोविड रुग्ण संख्येचा आलेख वाढू लागल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये खासगी रुग्णालयांचे देखील सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांसह महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांची महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक १९ मार्च २०२१) दुपारी दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. विशेषतः कोविड-१९ रुग्णशय्या व्यवस्थापन तसेच लसीकरण या दोन्ही बाबींवर आयुक्तांनी निरनिराळ्या सूचना केल्या. या बैठकीला महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच रुग्णालयांचे अधिष्ठाता व प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीप्रसंगी महानगरपालिका आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मागील कालावधीच्या तुलनेत मृत्यू दराचे हे प्रमाण कमी असले तरी एकंदरीत कोविड मृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी तसेच कोविड-१९ बाधेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून त्यांनी कोविड-१९ लसीकरणाच्या दृष्टीने सूचना केल्या. त्या पुढीलप्रमाणेः
१) मुंबईमध्ये सद्यस्थितीत एकूण ५९ खासगी रुग्णालयांना कोविड-१९ लसीकरणासाठी निर्देशित करण्यात आले आहे. असे असले तरी या रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प म्हणजे सर्व मिळून दररोज फक्त ४ हजार इतके आहे. यामुळे प्रत्येक खासगी रुग्णालयाने दररोज किमान १ हजार पात्र नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करुन त्याप्रमाणे कार्यवाही केली पाहिजे.
२) लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच जवळच्या संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांनी लसीकरणासाठी यावे, म्हणून खासगी रुग्णालयांनी रोटरी, लायन्स यांच्यासारख्या सामाजिक व सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी.
३) लसीकरणासाठी येणाऱया नागरिकांना कोणताही त्रास होवू नये, यासाठी लसीकरणाचे जास्तीत जास्त बूथ करावेत. तसेच पुरेशी जागा, पिण्याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्यवस्था आदी बाबींची पूर्तता करावी. लसीकरणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा, म्हणजे कोणालाही जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. पहिला व दुसरा डोस घेणाऱया नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष करावेत. जेणेकरुन लवकर लस देता येईल. गर्दी होणार नाही.
४) मुंबईतील जीवनशैली व कार्यालयीन वेळा लक्षात घेता, खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी केल्यास अधिकाधिक नागरिक लस घेवू शकतील. शक्य असल्यास आणि पुरेशी व्यवस्था करणे शक्य असेल तर २४ तास लसीकरणाची सोय करण्याचाही पर्याय विचारात घ्यावा. नागरिकांनी देखील वेळेची खात्री करुन लसीकरणासाठी पोहोचावे.
५) मुंबईत महानगरपालिकेचे २४ व शासकीय ८ असे मिळून ३२ रुग्णालये दररोज किमान ४१ हजार जणांना लस देतात. तर खासगी रुग्णालयांत फक्त ४ हजार जणांना दररोज लस दिली जाते. महानगरपालिकेच्या व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्था व व्यवस्थापनाचे मुंबईकरांनी भरभरुन कौतुक केले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी लसीकरणाचा वेग वाढवावा, जेणेकरुन मुंबईतील सर्व पात्र नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स आदी सर्वांना लस लवकरात लवकर मिळू शकेल.
६) मुंबईत लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची संख्या सध्याच्या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही मंजुरी प्राप्त होताच सर्व सरकारी व खासगी रुग्णालये मिळून दररोज किमान १ लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येईल. ४५ दिवसांमध्ये पात्र अशा ४५ लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण करुन कोविड-१९ संसर्गाला वेळीच लगाम घालण्याचे प्रयत्न एकत्रितपणे करावयाचे आहेत.
*७)रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींची परिणामकारकता सारखीच असून त्यांच्याबाबत नागरिकांनी चिंता बाळगण्याचे कारण नाही. ज्या लसीचा पहिला डोस घेतला असेल, त्याचाच दुसरा डोस घ्यावा लागणार असून त्याप्रमाणे लस उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक पात्र मुंबईकर नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. मुंबईतील लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची माहिती नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचविण्यात येईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.*
लसीकरणाबाबतचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त श्री. चहल यांनी कोविड-१९ रुग्णशय्या उपलब्धतेचा तसेच खासगी रुग्णालयांमधील कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच युद्धपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना करुन वेगवेगळे निर्देशही दिले. यावेळी आयुक्त म्हणाले की, मुंबईमध्ये सध्या दररोज २५ हजार कोविड तपासण्या होत आहेत. कोविड-१९ संसर्ग वाढत असल्याचे पाहता ही संख्या टप्प्याटप्प्याने दुप्पट म्हणजे दररोज ५० हजार इतकी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अधिकाधिक रुग्ण शोधण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वाभाविकच रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून येत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांचे प्रमाण लक्षणीय आहे. असे असले तरी, आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात, असे सांगून आयुक्तांनी पुढीलप्रमाणे सूचना केल्या.
१) वाढती रुग्णसंख्या पाहता येणारे चार ते सहा आठवडे हे अत्यंत महत्त्वाचे असतील. चाचण्यांसोबत बाधित रुग्णांचे प्रमाणही अधिक आढळू शकते. त्यामुळे सौम्य, मध्यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेशा संख्येने रुग्णशय्या उपलब्ध असणे आवश्यक आहे. हे पाहता महानगरपालिकेच्या तसेच शासकीय आणि मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी जुलै २०२० मध्ये असलेली रुग्णशय्या क्षमता पुन्हा एकदा उपलब्ध करणे आवश्यक आहे.
२) जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, मुंबईतील शासकीय रुग्णालयांमधील कोविड-१९ रुग्णशय्यांची संख्या आज अधिक आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये देखील ही क्षमता वाढविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर खासगी रुग्णालयांनी देखील पुन्हा एकदा कोविड रुग्णशय्यांची संख्या वाढवावी. येत्या ४८ तासांमध्ये ही पूर्ण व्यवस्था उपलब्ध करावी.
३) रुग्णशय्यांमध्ये ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडची संख्या पुरेशी राहील, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी साधनसामुग्री, पुरक मनुष्यबळ आदी सर्व व्यवस्था युद्ध पातळीवर करावयाची आहे. तसेच ही सर्व कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती रुग्णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच लागलीच महानगरपालिकेला कळवावी.
४) काही मोजकी खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेताना अग्रीम रक्कम भरण्याचा आग्रह धरत असल्याचे आणि त्याशिवाय रुग्णांना दाखल करुन घेत नसल्याचे आढळत आहे. अशा रुग्णालयांनी ८० टक्के सरकारी कोट्यातील रुग्णशय्यांवर दाखल करुन घेताना अग्रीम रक्कमेचा आग्रह धरु नये. तसेच सरकारने निर्गमित केलेल्या निर्णयाप्रमाणच दर आकारणी करुन रुग्णांना देयक द्यावे. रुग्णालयांमध्ये कोविड-१९ उपचारांसाठी कोणत्या सुविधेला किती दर आकारले जातात, त्याचे दर्शनी फलक लावावेत. काही मोजक्या रुग्णालयांमुळे एकूणच सर्व रुग्णालये बदनाम होवून नागरिकांच्या मनात प्रतिमा बिघडते, असे होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
५) खासगी रुग्णालयांमध्ये पुन्हा नव्याने महानगरपालिकेचे प्रत्येकी २ लेखापरीक्षक नेमण्यात येतील. रुग्णांना उपचारासाठी देण्यात आलेल्या देयकांमध्ये अवाजवी आकारणी केल्याबाबतच्या तक्रारींची पडताळणी करण्याबाबतची कार्यवाही सुनिश्चित पद्धतीनुसार पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
६) महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये कोविड-१९ रुग्णांना दाखल करताना वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातूनच व्यवस्थापन करण्यात येते. खासगी रुग्णालयांमध्ये देखील रुग्ण दाखल करताना सर्वप्रथम वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातूनच त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तीव्र बाधा असलेल्या/ अतिदक्षता उपचारांची आवश्यक असलेल्या रुग्णांना ते थेट आल्यास (वॉक इन) दाखल करुन घ्यावे. मात्र, अशा रुग्णांची माहिती वॉर्ड वॉर रुमला तत्काळ कळवावी.
७) लक्षणे नसलेल्या बाधितांना (एसिम्प्टोमॅटिक) शक्यतो गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरण करावे. जेणेकरुन रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात रुग्णशय्या उपलब्ध राहतील. त्यासाठी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून याबाबत उचित कार्यवाही करावी. रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसलेल्या एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना अकारण दाखल करुन घेवू नये. अन्यथा, रुग्णशय्या व्यापल्या जातात व गरजू रुग्णांची अडचण होवू शकते. बाधितांमध्ये एसिम्प्टोमॅटिक रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ह्या बाबीचे योग्यरित्या पालन होणे आवश्यक आहे.
८) कोविड तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज देवून घरी विलगीकरणात रवाना करावे. घरी योग्य व्यवस्था नसल्यास किंवा अशा रुग्णांना घरी जायचे नसल्यास त्यांना महानगरपालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे. जेणेकरुन गरजू रुग्णांसाठी सातत्याने बेड उपलब्ध होत राहतील. अद्ययावत डिस्चार्ज पॉलिसीचे सर्व रुग्णालयांनी योग्यरित्या पालन करणे आवश्यक आहे.
९) रुग्णांना महागडी औषधे, इंजेक्शन आदी पुरविताना खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्य नातेवाईकांची संमती घ्यावी. तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवावी. जेणेकरुन नंतर देयकांबाबत वाद निर्माण होणार नाहीत.
*
टिप्पणी पोस्ट करा