मुंबई : मुंबई अग्निशमन दलात 54 कंत्राटी वाहन चालक घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला. मात्र या खासगीकरणाविरोधात मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनने कामगार आयुक्तांकडे धाव घेतली. अखेर कामगार उप आयुक्त यांनी यासंबंधी समेट घडवून आणण्यासाठी हे प्रकरण दाखल करून घेतले आहे. पुढील बैठक कामगार उप आयुक्तांकडे 8 एप्रिल रोजी होणार आहे. बैठकीत युनियनचे पदाधिकारी आणि अग्निशमन अधिकारी असणार आहेत.
वाहन चालकाचे पद हे अग्निशामकाचे पदोन्नतीचे पद आहे. वाहन चालक पदाच्या अर्हतेने हे पद भरण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे. मात्र अग्निशामकांना डावलून कंत्राटी पद्धतीने वाहन चालक घेतले जात आहे. याविरोधात आम्ही कामगार आयुक्तांकडे धाव घेतली. कामगार उप आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत युनियनने आपली बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळेच या प्रकरणी समेट घडवून आणण्यासाठी प्रकरण कामगार उप आयुक्तांनी दाखल करून घेतले आहे, असे मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले.
यंत्र चालकाच्या पदाची अहर्ता असणारे 100 अग्निशमन जवान आज वाहन चालक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. तर जड वाहनांचा परवाना असलेले 300 अग्निशमन जवान अग्निशमन दलात आहेत, असे बने यांनी सांगितले.
कंत्राटी वाहन चालक घेण्याचा प्रस्ताव ज्यावेळी स्थायी समिती समोर येणार होता, त्याच वेळी प्रशासन, स्थायी समिती तसेच महापौर यांना पत्राद्वारे कंत्राटी चाहन चालक घेण्याच्या प्रस्तावाला युनियनने विरोध केला होता. तरीही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याच दरम्यान, याप्रकरणी कामगार आयुक्तांकडे धाव घेतली होती, असे बने यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा