मुंबई : घाटकोपर येथील माता रमाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर ही दाटीवाटीची वस्ती आणि अशा वस्तीत एखादी आगीची घटना घडली की, विक्रोळी आणि देवनार येथील अग्निशमन केंद्रा सोबत मानखुर्द अग्निशमन केंद्रावर अवलंबून रहावे लागत असे. यात बराच वेळ जाई. त्यामुळे अशा दाटीवाटीच्या वस्तीकरीता फायर स्टेशन असावे, अशी मागणी पुढे आली खरी पण येथे अग्निशमन केंद्र उभे राहण्याकरिता २६ वर्षांचा काळ गेला.
सुमारे २५ हजाराहून अधिक लोक वस्ती माता रमाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरची आहे. दाटीवाटीने वसलेल्या या झोपटपट्टीच्या ठिकाणी फायर स्टेशन असावे अशी पहिली मागणी १९९५ च्या सुमारास पुढे आली. त्यावेळी या दोन वस्त्यांना लागून असलेल्या हायवेच्या ठिकाणी फायर स्टेशन उभारण्याचे ठरत होते.
त्यावेळी गोदरेज कंपनीने स्वतः च्या गोदरेज कॉलनीत स्व खर्चाने फायर स्टेशन उभारण्याची जबाबदारी उचलली खरी, पण त्या फायर स्टेशनला गोदरेज कंपनीचे नाव देण्याची अट कंपनीने पालिका प्रशासनासमोर ठेवली होती. पुढे हा प्रस्ताव रेंगाळत राहिला आणि आता नव्या डीपी प्लॅननुसार, माता रमाई आंबेडकर नगरात मिनी फायर स्टेशन उभारणी करिता जागा उपलब्ध झाली, अशी माहिती संबंधित अग्निशमन अधिकारी यांनी दिली.
आता माता रमाई आंबेडकर नगरात नव्याने उभारलेल्या मिनी फायर स्टेशनमध्ये मिनी फायर इंजिन आहे. हे फायर इंजिन दाटीवाटीच्या वस्तीत आरामात आत पर्यंत जाऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथमिकता स्तरावर काम करू शकते. या मिनी फायर इंजिनची क्षमता ४५० लिटर पाण्याची असली तरी आगीवर अत्यंत फोर्सने पाणी मारण्याची क्षमता यामध्ये आहे, असे अग्निशमन अधिकारी यांनी सांगितले.
तसेच हायवेवर एखादा अपघात झाला तरी या मिनी फायर इंजिनमधील उपकरणांनी आपत्कालीन काम ही करता येणार आहे, असे ते म्हणाले.
---------/----------/--------------/----------------/-----------/--------
घाटकोपर येथील माता रमामाई आंबेडकर नगर येथील नव्या अग्निशमन बीट केंद्राचे उदघाटन येथील स्थानिक नगरसेविका रुपाली आवळे आणि नगरसेवक सुरेश आवळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उप प्रमुख अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत, विभागीय अग्निशमन अधिकारी गिरकर, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी माईंकर आणि वरिष्ठ स्टेशन अधिकारी शितोळे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा