(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे | मराठी १ नंबर बातम्या

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे



जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे

 

            मुंबई, दि. 15 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले.

            आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.

            संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

            राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget