मुंबई, दि.५ : महापालिका स्थायी समितीला ९७५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याशी बोलताना मान्य केले होते. मात्र एका पक्षाच्या गटनेत्याने त्याच दिवशी रात्री फोन करून निधीत कपात करण्यास सांगितल्याने स्थायी समितीला मिळणाऱ्या निधीत २५० कोटींची कपात झाली आहे. त्या गटनेत्याचे नाव मी चार दिवसांनी उघड करणार आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.
मात्र निधीत २५० कोटी रुपयांची कपात झाल्याचे खापर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, भाजपवर म्हणजे भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांच्यावर फोडले आहे, असेही भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले. परंतु, शिरसाट यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नाही.
मुंबई महापालिका स्थायी समितीच्या माध्यमातून ६५० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांना नुकतेच करण्यात आले. मात्र आयुक्तांनी २५० कोटींचा निधी कपात केल्याच्या विषयावरून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते.
आता भाजपचे शिरसाट व पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यात याच निधीवाटप व कपातीच्या विषयावरून आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दरम्यान, भाजपचे एक सदस्य हे धादांत खोटे बोलत असून खोटेही रेटून बोलत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी केला आहे.
काँग्रेसला भाजपपेक्षाही जास्त निधी मिळाल्याने भाजपचे शिरसाट यांना त्याची पोटदुखी झाल्याची टिका रवी राजा यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा