(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भांडुप येथील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलीसांकडून चौकशी सुरु | मराठी १ नंबर बातम्या

भांडुप येथील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलीसांकडून चौकशी सुरु



*आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून कार्यवाही सुरु

मुंबई : भांडुप येथील रेल्वे स्थानकाजवळ स्थित ड्रिम्स मॉल व त्यात तिस-या मजल्यावरील सनराईज रुग्णालयामध्ये आग लागून श्वास गुदमरल्याने ९ व्यक्तिंचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. तसेच सदर रुग्णालयात उपचारादरम्यान २ कोविड बाधितांचा मृत्यू झाला होता, त्यांचेही मृतदेह बाहेर काढल्याची माहिती संबंधित रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे. या दुर्घटनेप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनाने पोलीसांना केली असून त्यानुसार पोलीसांमार्फत पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. आग लागल्याचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने कार्यवाही सुरु केली आहे.

दरम्यान, दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक २६ मार्च २०२१) भेट दिली. सर्व कोविड रुग्णालये व कोविड केंद्रांची अग्निसुरक्षा तातडीने तपासून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री. ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

भांडुप येथील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ स्थित ड्रिम्स मॉलमध्ये काल (दिनांक २५ मार्च, २०२१) रात्री सुमारे १२ वाजता प्रारंभी पहिल्या मजल्यावर आग लागली. तळघर, तळमजला अधिक ३ मजले या स्वरुपाच्या या मॉलमध्ये तिस-या मजल्यावर सुमारे १०७ रुग्णशय्या क्षमतेचे सनराईज हॉस्पिटल देखील कार्यरत होते. या रुग्णालयात घटनेप्रसंगी ७८ रुग्ण उपचार घेत होते.  

पहिल्या मजल्यावर लागलेली आग काही क्षणात दुस-या मजल्यावरही पोहोचली. त्यातून निघत असलेल्या धुराने तिस-या मजल्यावरील रुग्णालयात कोविड विभाग तसेच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांना श्वास गुदमरण्याचा त्रास झाला. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासह रुग्णांची सुटका करुन त्यांना सुरक्षित पद्धतीने जवळपासच्या कोविड रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. 

आग लागल्याची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी हे स्वतः रात्रीच घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधला तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या.

 महानगरपालिकेच्या प्रमाणित कार्यपद्धतीप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने देखील जल नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल, जल अभियंता विभाग, विभाग कार्यालय नियंत्रण कक्ष, पोलीस, वाहतूक पोलीस, विद्युत विभाग या सर्वांशी समन्वय साधला. त्यामुळे वेळीच मनुष्यबळ व साधनसामुग्री घटनास्थळी पोहोचून मदत कार्य वेगात करणे शक्य झाले. तसेच जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयांना सूचना देऊन सनराईज रुग्णालयातील कोविड रुग्णांना नेऊन सामावून घेण्यासाठी रुग्णवाहिकांसह आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली.

अग्निशमन दल, मुंबई पोलीस व इतर यंत्रणांचा सहकार्याने ६८ रुग्णांची सुखरुप सुटका करुन त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या सर्व कामकाजामध्ये उप आयुक्त (परिमंडळ - ६), एस विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह वेगवेगळे अभियंता, आरोग्य अधिकारी, इतर कामगार, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही केली. 

आग विझविण्याकामी मुंबई अग्निशमन दलाने १ रोबोट, २० मोटर पंप, १५ जंम्बो टँकर, ३ वॉटर टँकर, २ उंच शिड्या, १ उंच फिरती शिडी, श्वसन यंत्रणा असलेली ३ वाहने, १ नियंत्रण कक्ष वाहन यासह इतर वाहने व साधनसामुग्री तैनात करुन आग विझविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.

या आगीच्या दुर्घटनेत दुर्दैवाने धुरामुळे श्वास गुदमरुन ९ व्यक्तिंचा मृत्यू ओढवला असून त्यांच्या कुटुंबियांप्रती महानगरपालिका प्रशासन संवेदना व्यक्त करीत आहे. दरम्यान, सनराईज रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झालेल्या २ व्यक्तिंचे मृतदेह देखील घटनास्थळावरुन बाहेर काढल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने भांडुप पोलीसांकडे या दुर्घटनेप्रकरणी सविस्तर पोलीस चौकशी करण्याची विनंती केली आहे.  त्यानुसार पोलीसांनी कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान, आग लागल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचे कारण शोधून काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने कार्यवाही सुरु केली आहे. 

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget