मुंबई : महिलांमध्ये स्तन कॅन्सर बाबत अधिक जनजागृती व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काळाचौकी, अभ्युदय नगर येथील आरोग्य केंद्रात स्तन कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घघाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज दिनांक ९ मार्च २०२१ रोजी पार पडले.
याप्रसंगी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ, उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर महिलांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, ३० वर्षावरील महिलांची स्तन कॅन्सर आरोग्य तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत ४५ वर्षावरील महिलांची स्तन कॅन्सर आरोग्य तपासणी करण्यात येते.
स्तन कॅन्सरची आरोग्य तपासणी ही खर्चिक व वेदना देणारी बाब असल्याने महिलांचे या तपासणीकडे दुर्लक्ष होते. बाहेर खासगी रुग्णालयांमध्ये या तपासणीचे अठराशे ते दोन हजार रुपये दर आकारला जातो. ही खर्चिक बाब लक्षात घेऊन, बंगलोरच्या निरामय हेल्थकेअर या कंपनीने पुढाकार घेतला असून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि थरमोग्राँफी या तंत्रज्ञानावर आधारित कॅन्सर निदान तपासणी विकसित केली आहे. सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या तपासणीपेक्षाही ही तपासणी अत्याधुनिक असल्याचे महापौरांनी सांगितले. यामध्ये कोणताही स्पर्श न करता, बंदिस्त रूममध्ये ही तपासणी करता येते. त्याचप्रमाणे महिलेला कोणतेही रेडिएशन न देता वेदनारहित ही तपासणी होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन या रुग्णालयांमध्ये प्रायोगिक स्तरावर ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच महापालिका रुग्णालयांमध्ये या तपासणीचा दर हा फक्त सहाशे रुपये ठेवण्यात आला असल्याचे महापौरांनी सांगितले.
*****
टिप्पणी पोस्ट करा