मुंबई, दि.५ : महापालिका शहर, पूर्व उपनगर - नगरबाह्य, पश्चिम उपनगर, पश्चिम उपनगर - दक्षिण विभाग या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी चार कंत्राटदारांची नेमणूक करणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावांना शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
यामध्ये, शहर विभागात मे. डी.बी. इन्फ्राटेक कंत्राटदाराला ३.६४ कोटी रुपयांचे कंत्राट, पश्चिम उपनगर - दक्षिण विभागात मे.सी. एन. लिधानी इंटरप्रायजेस या कंत्राटदाराला ३.४३ कोटी रुपयांचे तर पश्चिम उपनगरात मे. ऍक्युट डिझाईन्स या कंत्राटदाराला ३.५९ कोटी रुपयांचे आणि पुन्हा याच कंत्राटदाराला पूर्व उपनगर - नगरबाह्य विभागात ( मुंबई बाहेर ठाणे हद्दीत) ३.८६ कोटी रुपयांचे असे एकूण १४.५३ कोटी रुपयांचे कंत्राट काम देण्यात आले आहे.
भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी या चारही प्रस्तावात सदर कंत्राटदारांनी किमान ३२% ते ३९% कमी दरात कंत्राटकाम करण्याची तयारी दर्शवल्याने जोरदार आक्षेप घेतला. एवढ्या कमी दरात कंत्राटदार उत्तम दर्जाची कामे कशी करणार, अशी शंका उपस्थित केली.
मात्र अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, जरी कमी दरात कंत्राटदार काम करणार असेल तरी कामाच्या दर्जाबाबत पालिका कोणतीही तडजोड करणार नाही. कामाचा दर्जा राखला जाईल. सदर कामांवर पालिकेकडून लक्ष देण्यात येईल. कंत्राटदाराने कामे समाधानकारक केल्याची खात्री झाल्यावर त्यास कंत्राट रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा