मुंबई : करोना महामारीमुळे नोकऱ्या आणि स्वतः चा व्यवसाय बुडालेल्या लोकांसमोर जगायचं कसं असा प्रश्न समोर उभा असताना आता पालिका प्रशासनाने पाण्याचे बिल न भरल्यामुळे पाणी ही देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता जगावं की मरावं, हेच लोकांना कळेनासे झाले आहे.
ही घटना मालाड परिसरातील असून शुक्रवारपासून येथे थकीत पाणी बिल असणाऱ्यांचे पाणी कनेक्शन तोडून पाण्याचे मीटर घेऊन जाण्याची कारवाई पालिका प्रशासन करत आहे. ही कारवाई शनिवारी ही सुरू होती.
महापालिका प्रशासनाच्या जल अभियंता विभागातील अभियंताने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहे. मार्च अखेर पर्यंत आम्हाला काहीही करून थकीत बिलांची दिलेली रक्कम वसूल करायची आहे. तसे आदेश ही वरून आले आहेत. याकरिता टार्गेट दिले असल्याने थेट पाण्याचे कनेक्शन कापणे आणि सोबत पाण्याचे मीटर काढून आणण्याची कारवाई करावी लागत आहे. याची पूर्व कल्पना आम्ही प्रत्येक इमारतीमधील सुरक्षारक्षक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तोंडी दिलेली आहे. त्यानुसारच कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे आम्ही थकीत पाण्याचे बिल भरतो. आम्ही नाही म्हटलेले नाही. पण कागदोपत्री चालणाऱ्या प्रशासनाने निदान पंधरा दिवसांची मुदत देत नोटीस द्वारे कळविले असते तर बरे झाले असते. करोना काळात नोकऱ्या आणि स्वतः चे व्यवसाय बुडल्याने पोट कसं भराव, असा प्रश्न समोर असताना समजून न घेता थेट लोकांना पाणी नाकारणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काहीजण मोठमोठ्या टॉवर मधील सुरक्षारक्षकांच्या हातापाया पडून दोन चार पाण्याच्या हंड्याची सोय करून घेत आहे. तर काहीजण चक्क एक गॅलनभर पाणी 30 ते 50 रुपयांनी विकत घेत आहेत.
हाताला काही काम नसल्याने पालिकेने आम्हाला हप्त्या हप्त्याने थकीत पाणी बिलांची रक्कम भरण्यासाठी सुविधा द्यावी. आमच्या थकीत बिलात ही सवलत द्यावी, अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे.
सोमवारी पालिका प्रशासनाचे कार्यालय उघडणार असल्याने रविवारी ही लोकांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे.
दरम्यान, पाणी कनेक्शन तोडणार आहे, याची पूर्व कल्पना लोकांना देणे आवश्यक आहे. पाणी मूलभूत गरज आहे. त्यामुळे काहीही पूर्व सूचना न देता पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई ही अमानवी कृत्य असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपाचे सचिव ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा