(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महानगरपालिका आयुक्त चहल यांनी घेतली कोविड प्रतिबंधक लस | मराठी १ नंबर बातम्या

महानगरपालिका आयुक्त चहल यांनी घेतली कोविड प्रतिबंधक लस



*मुंबईत कोविड उपचारांसाठी रुग्‍णशय्यांची कमतरता नाही, आयसीयू व व्‍हेंटिलेटरही उपलब्‍ध

*विविध रुग्‍णालयांमध्‍ये मिळून लवकरच २० हजारांपेक्षा जास्त बेडपर्यंत क्षमता वाढ*

*वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच होणार रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापन*

*कोविड निर्बंधांचे पालन केले नाही तर आवश्‍यक तिथे कठोर निर्णय घेणार*

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक ३० मार्च २०२१) सकाळी वांद्रे-कुर्ला संकूलातील भव्‍य कोविड केंद्रात कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी लस महत्‍त्‍वाची असून सर्व पात्र नागर‍िकांनी कोविड लस टोचून घ्‍यावी, असे आवाहन चहल यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना यावेळी केले. मुंबईत कोविड उपचारांसाठी रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. आजही ६५० आयसीयू बेड व २५० व्‍हेंटिलेटर उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. आवश्‍यकतेनुसार एकूण रुग्णशय्या वाढविण्‍याची कार्यवाही वेगाने सुरु आहे, असे आश्‍वस्‍त करतानाच कोविड निर्बंधांचे पालन नागरिकांनी केले नाही तर आवश्‍यक त्‍याबाबतीत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही चहल यांनी स्‍पष्‍टपणे नमूद केले.

लस घेतल्‍यानंतर महानगरपालिका आयुक्‍त श्री. चहल प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना म्‍हणाले की, मुंबईत लसीकरणासाठी पात्र नागर‍िकांची संख्‍या सुमारे ४० लाख आहे. आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्‍यात आले आहे. त्‍यातही बीकेसी कोविड केंद्रातील लसीकरण केंद्र हे आजमितीस देशात सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र असल्‍याचे सांगून अधिष्‍ठाता डॉ. राजेश डेरे व त्‍यांच्‍या सहकाऱयांचे आयुक्‍तांनी अभिनंदन केले. मुंबईतील सध्‍याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून ती दररोज १ लाखांवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत. त्‍यासाठी आणखी २६ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी, म्‍हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. सध्‍या ५९ खासगी रुग्‍णालयांना लसीकरणाची परवानगी असून त्‍यांनी लसीकरणाची दैनंदिन संख्‍या वाढवावी, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. एकत्रित प्रयत्‍नातून लसीकरणाची संख्‍या वाढेल. लसीकरणाचा वेग वाढला तर संसर्ग निश्चितच आटोक्‍यात येईल, असा आशावादही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पुढे ते म्‍हणाले की, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्‍यांची संख्‍या आणि वेग वाढविण्‍यात आला आहे. स्‍वाभाविकच बाधित रुग्‍ण मोठ्या संख्‍येने शोधून काढणे, त्‍यांना वेळीच विलगीकरण करुन गरजू रुग्‍णांना योग्‍य उपचार देणे शक्‍य होत आहे. चाचण्‍यांची संख्‍या लवकरच ६० हजार प्रतिदिन होणार असून त्‍यामध्‍ये सध्‍याच्‍या प्रमाणानुसार बाधितांची संख्‍या दररोज १० हजारपर्यंत आढळू शकते. या बाधितांपैकी रुग्‍णशय्येची आवश्‍यकता असणाऱयांची संख्‍या सध्‍याची स्थिती पाहता तुलनेने खूप कमी असेल. मुंबईतील कोविड मृत्‍यू दर देखील आता अल्‍प आहे. वाढत्‍या रुग्‍ण संख्‍येसाठी रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापन (बेड मॅनेजमेंट) पूर्वीप्रमाणेच वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येत आहे. काही व्‍यक्‍ती परस्‍पर वैद्यकीय प्रयोगशाळांकडून चाचणीचा अहवाल प्राप्‍त करुन खासगी रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णशय्या मिळवण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. परिणामी रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापनाची साखळी तुटते. त्‍यामुळे कालच महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रक निर्गमित करुन कोणत्‍याही परिस्थितीत वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच सरकारी तसेच खासगी रुग्‍णालयात बेड उपलब्‍ध करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. लक्षणे आढळत असलेल्‍या तसेच सहव्‍याधी असलेल्‍या गरजू रुग्‍णांना मागणीनुसार बेड उपलब्‍ध करुन दिले जात आहेत, असेही चहल यांनी नमूद केले.

दिनांक १० फेब्रुवारी २०२१ ते ३० मार्च २०२१ या ४८ दिवसात एकूण ८५ हजार रुग्‍ण आढळले. यात ६९ हजार ५०० रुग्‍ण हे लक्षणे नसलेले बाधित म्‍हणजे एसिम्‍प्‍टोमॅटिक आढळले. त्‍यांना घरी विलगीकरणात ठेवण्‍यात आले. उर्वरित १५ हजार ५०० रुग्‍णांना लक्षणे आढळली. त्‍यातही ८ हजार जणांनाच रुग्‍णालयात दाखल करावे लागले. इतरांना सौम्‍य लक्षणे असल्‍याने औषधोपचाराने ते बरे झाले. सद्यस्थितीत मुंबईत कोविड रुग्‍णांसाठी राखीव असलेल्‍या रुग्‍णशय्यांपैकी सुमारे ३ हजार रुग्‍णशय्या रिक्‍त आहेत. यात खासगी रुग्‍णालयातील ४५० बेडचाही समावेश आहे. थोडक्‍यात रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. यापुढेही कमतरता भासणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता महानगरपालिका प्रशासन घेत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये. रुग्‍णांनी व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी आपापल्‍या विभागातील वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधला की त्‍यांना आवश्‍यकतेनुसार बेड पुरवला जाईल, असे सांगून श्री. चहल यांनी मुंबईकरांना आश्‍वस्‍त केले.


महानगरपालिकेच्‍या जम्‍बो कोविड सेंटर्स तसेच खासगी रुग्‍णालयात ८० टक्‍के रुग्‍णशय्या पुन्‍हा कोविड रुग्‍णांसाठी सक्रिय केल्‍या जात आहेत, असे सांगून श्री. चहल यांनी सविस्‍तर माहिती द‍िली. ते म्हणाले की, मुंबईत दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी ३ हजार ५०० इतकी रुग्‍णशय्या व्‍याप्‍ती होती. तर आता ९ हजार ९०० रुग्‍णशय्यांवर रुग्‍ण आहेत. पैकी ८ हजार ४०० मुंबईतील तर १ हजार ५०० मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. याचाच अर्थ मागील ४८ दिवसांत एकूण बाधितांच्‍या संख्‍येच्‍या तुलनेत फक्‍त ५ हजार बेड रुग्‍णांसाठी आवश्‍यक भासले. म्‍हणून रुग्‍णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आयुक्‍तांनी केले.


रुग्‍णशय्या वाढीबाबत श्री. चहल म्‍हणाले की, सध्‍याची रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण २० हजारापेक्षा जास्त इतकी करण्‍यात येत आहे.  दर आठवड्याला टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने याप्रमाणे ही संख्‍या वाढवण्‍यात येत आहे. जून ते नोव्‍हेंबर २०२० या कालावधीत महानगरपालिकेकडे ताब्‍यात असलेली खासगी लहान रुग्‍णालयांची सुमारे २ हजार २६९ रुग्‍णशय्या क्षमता महानगरपालिकेने आता पुन्‍हा ताब्‍यात घेतली आहे. ‍यामध्‍ये ३६० अतिदक्षता उपचारांसाठी आहेत. 


तसेच, मुंबईतील ३५ मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये मिळून ४ हजार ८०० बेड कोविड रुग्‍णांच्‍या उपचारांसाठी उपलब्‍ध होते. कोविड संसर्ग मध्‍यंतरी नियंत्रणात आल्‍यानंतर सर्व मिळून २ हजार ३५० रुग्‍णशय्या इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले होते. संसर्ग वाढत असल्‍याने आता पुन्‍हा ४ हजार ८०० ही मूळ कोविड रुग्‍णशय्या क्षमता गाठण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. म्‍हणजेच, लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून ७ हजार रुग्‍णशय्या कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध होतील, असे आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले. 


महानगरपालिकेच्‍या जंबो सेंटर्सविषयी माहिती देताना आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले की, बीकेसी कोविड सेंटर टप्‍पा २ मध्‍ये सुमारे ७५० तर गोरेगांव येथील नेस्‍को कोविड सेंटरमध्‍ये १ हजार याप्रमाणे रुग्‍णशय्या उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. नेस्‍कोची क्षमता ३ हजार रुग्‍णशय्यांची असून सध्‍या १ हजार बेड उपलब्‍ध आहेत. बीकेसीमध्‍ये २,१०० बेड क्षमता असून सध्‍या १ हजार बेड उपलब्‍ध आहेत. रिचर्डसन क्रूडास कोविड सेंटरमध्‍ये ७०० बेड उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. फक्‍त जम्‍बो सेंटर्सचा विचार करता एकूण ९ हजार रुग्‍णशय्या उपलब्‍ध असतील. सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये इत्‍यादी मिळून सुमारे २० हजारापेक्षा जास्त रुग्‍णशय्या मुंबईमध्‍ये उपलब्‍ध राहणार असून हे सर्व बेड तयार आहेत. ते फक्‍त टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने व मागणीनुसार कार्यान्‍व‍ित करायचे आहेत, असे चहल यांनी नमूद केले. 


वाढती रुग्‍णसंख्‍या रोखण्‍यासाठी प्रशासन, सरकार सर्वतोपरी प्रयत्‍न करीत आहेच, मात्र त्‍याला नागरिकांकडून संपूर्ण सहकार्य मिळणे देखील तितकेच आवश्‍यक आहे. मुंबईत सध्‍या रात्रीची संचारबंदी लागू आहे. येत्‍या काही दिवसांत कोविड-१९ संसर्गाची परिस्थिती पाहून आगामी काळाचे नियोजन ठरवण्‍‍यात येईल. निर्बंधांचे योग्‍य पालन सर्व घटकांनी करावे, असेही अखेरी चहल यांनी नमूद केले.

*****


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget