(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मालमत्ता कर वेळेत न भरणा-यांना २ टक्के दराने दंड लागणार | मराठी १ नंबर बातम्या

मालमत्ता कर वेळेत न भरणा-यांना २ टक्के दराने दंड लागणार


*१ दिवसात ४१६ कोटी, तर आतापर्यंत ३,४८६ कोटी मालमत्ता कर जमा

*मालमत्ता कर वसुलीसाठी जप्तीसह विविधस्तरीय धडक कारवाई सुरु

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे यंदाचा मालमत्ता कर जमा करावयाची अंतिम तारीख ०८ मार्च, २०२१ अशी होती. मालमत्ता कर भरावयाच्या या शेवटच्या दिवशी रुपये ४१५ कोटी ८५ लाख एवढ्या मालमत्तचा कराचा भरणा नागरिकांद्वारे करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी जमा झालेली एकूण रक्कम ही रुपये ३ हजार ४८६ कोटी इतकी झाली आहे. यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे रुपये ५ हजार २०० कोटींचे लक्ष्य असून, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे मालमत्ता कर वसुलीच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेत असून, त्यांच्या मार्गदर्शनात याबाबत सूक्ष्मस्तरीय नियोजन व अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे.   

..

या निमित्ताने कर निर्धारण व संकलन खात्याचे सह आयुक्त श्री. सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा; जेणेकरुन थकीत मालमत्ता कर रकमेवर दरमहा २ टक्के रकमेची दंडात्मक आकारणी; जल जोडणी खंडित करणे, चल संपत्ती जप्त करणे, अटकावणी (Attachment) करणे यासारखी विविध स्तरीय कारवाई टाळता येईल.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे अव्याहतपणे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येत असतात. या सेवा-सुविधा नियमितपणे देण्यामध्ये नागरिकांकडून कर रुपात गोळा होणा-या महसुलाची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत जमा करावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वारंवार विनंती व सूचना करण्यात येत असतात. मात्र, असे प्रयत्न करुनही वेळेत मालमत्ता कराचा भरणा न करणा-यांवर दरमहा आवर्ती दराने शिल्लक रकमेवर २ टक्के दंडाची आकारणी देखील केली जाते. तर त्यानंतर देखील मालमत्ता कराचा भरणा न करणा-यांबाबत संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाते. तर त्यापुढील टप्प्यात चल संपत्ती जप्त करण्याची, अटकावणीची (Attachment) कारवाई देखील केली जाते.

..

गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणा-यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी, विविध प्रकारची वाहने, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा (A.C.) यासारख्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत. या वस्तू जप्त केल्यानंतर ५ दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकी कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आली आहे.

==

 _मालमत्ता कर वसुलीचे टप्पे_ 

१. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. 

२. जे मालमत्ता धारक ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरु करण्यात येते. त्याचबरोबर मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर आवर्ती पद्धतीने दरमहा २ टक्के या दराने दंड आकारणी करण्यास देखील सुरुवात केली जाते.

३. टप्पेनिहाय कारवाई अंतर्गत सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास 'डिमांड लेटर' पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते.

४. त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग 'सील' (मोहोरबंद) करण्याची कारवाई; त्यानंतर मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता अटकावणीची (Property Attachment) कारवाई करण्यात येते.

५. वरील व्यतिरिक्त ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’ मधील कलम २०४ व २०५ अन्वये दुचाकी, चारचाकी, वाहने, फर्निचर, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारख्या चल संपत्ती असणा-या बाबी जप्त करण्याची कारवाई देखील गेल्या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. यानुसार सदर वस्तू जप्त केल्यानंतरही थकीत कराची वसुली पाच दिवसात न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत करांची वसुली केली जाते.

=

 _मालमत्ता कर भरण्यासाठीचे पर्याय_ 

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांचा मालमत्ता कर सुलभतेने भरता यावा, यासाठी विविध पर्याय महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पुढील पर्यायांचा समावेश आहे:

१. बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात (Citizen Facilitation Centre / CFC)  मालमत्ता करांचा भरणा रोख रकमेच्या स्वरुपात करता येतो. 

२. नागरिक सुविधा केंद्रात (Citizen Facilitation Centre / CFC) मालमत्ता कर रकमेचा ‘धनादेश’ (चेक) किंवा ‘धनाकर्ष’ (डिमांग ड्राफ्ट) जमा करुन देखील मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मालमत्ता कर देयकामध्ये नमूद केलेल्या तपशीलानुसार ‘धनादेश’ (चेक) किंवा ‘धनाकर्ष’ (डिमांग ड्राफ्ट) असणे आवश्यक आहे.

३. मालमत्ता कर देयकावर महानगरपालिकेचे बँक खाते क्रमांक नमूद केलेले असतात. या बँक खाते क्रमांकावर ‘एनईएफटी’ किंवा ‘आरटीजीएस’ द्वारे देखील ऑनलाईन पद्धतीने करांचा भरणा करता येतो.

४. बृहन्मुंबई महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपानावर नागरिकांकरिता (For Citizens) या पर्यायावर 'क्लिक' केल्यानंतर उघडणा-या ‘ड्रॉपडाऊन मेनू’ मध्ये 'मालमत्ता कर’ असा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायावर 'क्लिक' केल्यानंतर उघडणा-या पानावर 'मालमत्ता खाते क्रमांक' (Property UID) नमूद करुन संबंधित मालमत्तेवरील करांचा भरणा करता येऊ शकतो.

५. वरील संकेतस्थळासह 'MyBMC 24x7' या 'ऍन्ड्रॉईड ऍप' द्वारे देखील ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे ऍप 'प्ले स्टोअर' वर मोफत उपलब्ध आहे.

==

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget