मुंबई, दि.१० : नागरिकांना पर्यावरणाला घातक प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून 'ज्यूट बॅग' उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत ज्यूट बॅग' वाटप करण्याबाबतच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
भायखळा येथील प्रभाग क्रमांक २०९ चे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागात 'ज्यूट बॅग' वाटप करण्याबाबतच्या हा प्रस्ताव होता.
वास्तविक, यशवंत जाधव यांनी पालिकेच्या नियमांप्रमाणे प्लॅस्टिक पिशव्यांना आळा घालण्यासाठी प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या 'ज्यूट बॅग' वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी यशवंत जाधव हे जास्त निधीचा वापर करीत असल्याचा ठपका ठेवत ज्यूट बॅग खरेदी प्रकरणी आक्षेप घेतला होता.
तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनी ही 'ज्यूट बॅग' बाबतची फाईल अडवली होती. त्यामुळे यशवंत जाधव यांनी ज्यूट बॅग खरेदीबाबतची प्रक्रिया नियमाने होणार असताना त्याबाबतची फाईल का अडविण्यात आली, असा सवाल करीत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मात्र काही दिवसातच आयुक्तांच्या भूमिकेत अचानक बदल झाला. त्यामुळे आज स्थायी समितीच्या बैठकीत 'ज्यूट बॅग' खरेदी संदर्भातील प्रस्ताव मंजुरीला आला.
टिप्पणी पोस्ट करा