मुंबई : आजचा दिवस फार महत्वाचा ठरतो. आज 45 वर्षांवरील वयाच्या नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र लसीकरण करून काय फायदा, लसीकरण करून ही कोरोना होतो, असे गैरसमज पसरत असल्याने सुद्धा कदाचित काही लोक लसीकरण करण्यास येत नसतील, अशी शक्यता केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
केईएम रुग्णालयात सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. कोविल्डशिल्ड आणि को वैकसीन असे दोन्ही लसीकरण केईएम रुग्णालयात केले जात आहे.
गुरुवारी, 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील म्हणजे ज्यांचा जन्म 1 जानेवारी 1977 च्या आधी झालेला आहे. तसेच अशांना रक्तदाब वा मधुमेह वा अन्य आजार नसेल, त्यांना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.
आज पहिला दिवस असून 45 वर्षांवरील लोक लसीकरण करण्यास कमी प्रमाणात आले होते. कदाचित आज पहिला दिवस असल्याने मोठी गर्दी होऊ शकते, यामुळे कदाचित लोक दुसऱ्या वा तिसऱ्या दिवशी येऊ शकतात. मात्र त्यात ही काहीजणांचा असा समज असू शकतो की, लसीकरण करून काय फायदा, लस घेऊन ही कोरोना होऊ शकतो, या भीतीने सुद्धा कदाचित काही लोक येत नसतील, अशी शक्यता डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लसीकरण केल्याने आपण कोरोनाला हरवू शकतो. लसीकारणाने आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती तयार होऊन आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. त्यामुळे लोकांनी लसीकरण करणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा