*पावसाळा पूर्व-तयारीसाठी विविध यंत्रणांमध्ये सुसमन्वय साधण्याचे निर्देश*
*पावसाळा तयारी दरम्यान कोविड विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही निर्देश*
मुंबई : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जावा, या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान महानगरपालिका आयुक्तांनी विविध यंत्रणांकडून त्यांच्या स्तरावर करण्यात येत असलेल्या व करण्यात येणा-या पूर्व-तयारीचा आढावा घेतला. तसेच या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे आणि पावसाळा पूर्व-तयारीच्या अनुषंगाने कार्यवाही करताना कोविड विषयक सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले. त्याचबरोबर या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभागांनी देखील आपापल्या स्तरावर यथोचित सहकार्य व कार्यवाही करावी, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्त चहल यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले आहेत.
..
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी यांच्या विशेष उपस्थितीत आज एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित होते.
..
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यादृष्टीने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी नाले-सफाईची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यासोबतच रेल्वे हद्दीमध्ये देखील रेल्वे प्रशासनाद्वारे व महापालिकेच्या आर्थिक सहकार्यातून नाले-सफाईची कामे करण्यात येत आहेत. या विविध स्तरीय नाले-सफाई कामांचा आढावा आजच्या बैठकी दरम्यान घेण्यात आला. या अनुषंगाने लवकरच पाहणी दौ-यांचे आयोजन करण्यात येत असल्याचीही माहिती बैठकी दरम्यान देण्यात आली. तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनेक जुन्या इमारती या म्हाडाच्या अखत्यारित असून यापैकी धोकादायक इमारती रिकाम्या करुन घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने म्हाडा प्रशासनाने पोलीस दलाचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान केली.
..
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाचे पाणी साचू नये किंवा तुंबू नये, पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी आपापल्या स्तरावर अधिकाधिक परिपूर्ण काळजी घेण्याचे व त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आले. मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मुंबई मेट्रो रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने या बांधकामातून निघणारा राडारोडा वेळच्यावेळी हलवावा तसेच या कामांमुळे पावसाळ्या दरम्यान कुठेही पाणी साचणार नाही, याची काटेकोर काळजी मुंबई मेट्रो प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी मुंबई मेट्रोला दिले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्युत वितरण कंपन्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व उपाययोजना सुयोग्य प्रकारे राबवावी तसेच विद्युत वितरण व्यवस्थेचे आवश्यक ते ऑडिट करवून घ्यावे, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.
..
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणेच भारतीय नौदल हे आवश्यक त्या संसाधनासह व बचाव पथकांसह सुसज्ज असल्याची माहिती भारतीय नौदलातील कप्तान श्री. परेश यांनी बैठकी दरम्यान दिली. तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या चमू देखील आवश्यक त्या संसाधनांसह तैनात राहणार असल्याची माहिती संबंधित अधिका-यांद्वारे आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आली. तसेच मुंबई पोलीस दल देखील पावसाळ्या दरम्यान कार्यतत्पर असेल, अशी ग्वाही मुंबई पोलीस दलाद्वारे आजच्या बैठकी दरम्यान देण्यात आली. यासोबतच मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, हॅम रेडिओ इत्यादींच्या प्रतिनिधीं देखील त्यांच्या स्तरावर करण्यात आलेल्या पावसाळापूर्व तयारीची माहिती बैठकी दरम्यान दिली
टिप्पणी पोस्ट करा