*सर्व २४ विभाग कार्यालयांच्या परिसरांमध्ये नियोजनबद्धरित्या करणार प्रचार*
*युनिसेफच्या सहकार्याने चित्ररथाची निर्मिती, आणखी दोन चित्ररथ बनविण्याची कार्यवाही सुरु*
मुंबई : कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माहिती, शिक्षण व संपर्क विभागाने युनिसेफच्या सहकार्याने चित्ररथाची निर्मिती केली आहे. महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या चित्ररथाचा आज (दिनांक ५ एप्रिल २०२१) शुभारंभ करण्यात आला.
कोविड-१९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर होत असून तो रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः मास्क योग्यरित्या लावणे, हातांची नियमितपणे स्वच्छता राखणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य खात्याने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. युनिसेफ या संस्थेने सदर चित्ररथाच्या निर्मितीसाठी सहकार्य केले आहे. आणखी दोन चित्ररथांची निर्मिती करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तीनही क्षेत्रांमध्ये प्रत्येक एक चित्ररथ फिरवून जनजागृती करणे शक्य होणार आहे.
या चित्ररथामध्ये थ्रीडी मॉडेल साकारण्यात आले आहे. तसेच ध्वनिक्षेपण यंत्रणा देखील लावण्यात आली आहे. चित्ररथावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वयंसेवकांमार्फत निरनिराळे जनजागृतीपर संदेश देण्यात येतील. तसेच कोविड-१९ आजाराबाबतची माहिती देतानाच पत्रकांचे आणि मास्कचे वितरणही नागरिकांमध्ये करण्यात येणार आहे. विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत वॉर्ड वॉर रुमचे दूरध्वनी क्रमांकही चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये संपूर्ण परिसरात फिरुन जनजागृती करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनाही त्यामध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. विभागातील सर्व भागांमध्ये प्रचार करुन जनजागृती करण्यासाठी विभागीय समाज विकास अधिकारी यांच्यामार्फत समन्वय साधण्यात येईल. हा चित्ररथ जनजागृतीसाठी आज (दिनांक ५ एप्रिल २०२१) पासून धावत असून प्रत्येक विभागामध्ये एक दिवस याप्रमाणे सर्व २४ विभागांमध्ये जनजागृतीसाठी नियोजन करण्यात आले आहे, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
*****
टिप्पणी पोस्ट करा