· *शनिवार दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र*
· *रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण*
· *खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात दिनांक १०,११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही.*
· *तथापि,लससाठा अधिक उपलब्ध झाल्यास खासगी केंद्रातही पुन्हा सुरु करणार लसीकरण*
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ लसीकरण मोहीम अंतर्गत उद्या शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ आणि रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु ठेवण्यात येणार आहे. तथापि, मुंबईतील खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात दिनांक १०,११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. असे असले तरी, लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
परंतु कोविड-१९ लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात दिनांक १०,११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. महानगरपालिकेला आज (दिनांक ९ एप्रिल २०२१) रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा मिळणार आहे. अधिक प्रमाणात लससाठा उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित लसीकरण केंद्रांमध्ये शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र राहणार आहे.
ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री ८ वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.
रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.
***
टिप्पणी पोस्ट करा