मुंबई : कोरानाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, रुग्णांची कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर व आयसीयू बेडचा आढावा घेत असून आज दि. ०६ एप्रिल २०२१ रोजी कुर्ला भाभा येथील उपनगरीय सर्वसाधारण रुग्णालयाला भेट देऊन येथील सद्यस्थितीचा आढावा घेतला.
याप्रसंगी स्थानिक नगरसेविका सईदा खान, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, कुर्ला भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ.उषा शर्मा उपस्थित होत्या.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुर्ला भाभा रुग्णालयातील आयसीयू बेडची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कुर्ला भाभा रुग्णालयात ३५ व्हेंटिलेटर बेड असून त्यापैकी १२ बेड कोविडसाठी आरक्षित आहे. तसेच ९३ बेड हे ऑक्सीजन बेड आहे. कुर्ला हा परिसर लोकसंख्येची जास्त घनता असलेला परिसर असून येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा कमी पडू नये, याबाबत सदैव दक्ष राहण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच कार्यरत असलेल्या बेडमध्ये आणखी वाढ करता येईल का ? याची चाचपणी करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
*******
टिप्पणी पोस्ट करा