*मंत्री ठाकरे व महापौर यांच्या हस्ते एक्वर्थ महानगरपालिका रूग्णालयातील लसीकरण केंद्राचे लोकार्पण
मुंबई : बृहनमुंबई क्षेत्रातील लोकसंख्येचा विचार करता आणि कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिकेच्या सर्व २२७ निर्वाचन विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रं लवकरात लवकर सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत.
..
स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नाने वडाळा (पश्चिम) येथील एक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयात हे केंद्र आज (दिनांक २१ एप्रिल २०२१) पासून सुरू करण्यात आले आहे. पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे व मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
स्थानिक खासदार राहुल शेवाळे, 'एफ दक्षिण' आणि 'एफ उत्तर' प्रभाग समितीचे अध्यक्ष रामदास कांबळे, स्थानिक नगरसेवक अमेय घोले, उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, 'एफ दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आणि संबंधित अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
एक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरु केल्यामुळे वडाळा पूर्व व पश्चिम आणि माटुंगा या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. या ठिकाणी दोन बूथ कार्यान्वित केले असून प्रतिदिन ४०० पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.
हे लसीकरण केंद्र सुरू केल्याबद्दल नगरसेवक अमेय घोले आणि पालिका प्रशासनाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
****
टिप्पणी पोस्ट करा