*सर्व ६० रुग्ण सुरक्षित*
मुंबई : घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात कोविड बाधितांसाठी प्राणवायू साठ्याची कमतरता जाणवत असल्याची माहिती प्राप्त होताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या रुग्णालयात प्राणवायू साठा पोहोचवला. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व ६० रुग्ण सुरक्षित आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णालयांमध्ये प्राणवायू साठा पुरेसा उपलब्ध राहील, विशेषतः कोविड बाधित रुग्णांना प्राणवायू अभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अतिशय सतर्क आहे. महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू पुरवठादार यांच्याशी समन्वय राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती केली आहे. तसेच महानगरपालिकेने नेमलेली पथके प्राणवायूचे उत्पादन ते वितरण होईपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवून आहेत. या संपूर्ण कार्यप्रणालीची भूमिका अतिशय मोलाची असून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आज (दिनांक २१ एप्रिल २०२१) आला आहे.
एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात एकूण ६१ कोविड बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये ५० जणांना प्राणवायू पुरवला जात आहे तर ११ रुग्ण जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) वर आहेत. सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच प्राणवायू साठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने आज (२१ एप्रिल २०२१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेला कळवली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, एन विभागाचे सहायक आयुक्त अजित आंबी, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य महेंद्र खंदाडे ह्यांनी तातडीने समन्वय साधून या रुग्णालयात वेळीच प्राणवायू साठा पोहोचवला.
महानगरपालिकेच्या एस विभागातून ९ जंबो सिलेंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहचवले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित प्राणवायू पुरवठादाराने ४ ड्युरा सिलेंडर रुग्णालयात सायंकाळी ६.१५ च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित प्राणवायू पुरवठा सुरळीत राखला गेला. त्यासोबत एन विभागातून देखील १५ जंबो सिलेंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, रुग्णांना स्थलांतरित करण्याची गरज भासली तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सुदैवाने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याची आवश्यकता भासली नाही. हिंदू महासभा रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.
दरम्यान, हिंदू महासभा रुग्णालय येथील प्राणवायू पुरवठा संदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून, रुग्णालयाच्या परिसरात प्राणवायू व्यवस्था उभी करण्याविषयी एन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात उद्या (दिनांक २२ एप्रिल २०२१) सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापनासमवेत तातडीची बैठक देखील होणार आहे.
मुंबईतील रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा साठा व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचतो आहे, प्राणवायूचा वापर योग्यरित्या आणि काटकसरीने होतो आहे, यावर महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तातडीच्या प्रसंगासाठी प्राणवायू उत्पादकांना लागलीच सूचित करून तत्परतेने प्राणवायू पोचविण्याची कार्यवाही केली जात आहे.
*****
टिप्पणी पोस्ट करा