*खासगी रुग्णालयातील कोरोना बेडच्या सद्यस्थितीचा महापौरांनी घेतला आढावा*
मुंबई : कोविडबाधित परंतु लक्षणं नसलेले रुग्ण मोठ्या रुग्णालयातील बेड अडकून ठेवत असल्यामुळे गरजूवंत रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी मोठ्या खाजगी रुग्णालयातील कोविड वॉर्डला भेट देऊन बेडची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच रुग्णांशी संवाद साधला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी बॉम्बे रुग्णालय तसेच हिंदुजा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महापौर म्हणाल्या की, ज्याप्रमाणे रुग्णसंख्या वाढत आहे त्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका उपायोजना सुद्धा करीत आहे. लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या खासगी रुग्णालयातील बेड अडकून ठेवत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन मोठ्या खासगी रुग्णालयातील कोविड बेडची संख्या वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केली असल्याचे महापौरांनी सांगितले. न्यू मरीन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयाला आज भेट दिल्यानंतर याठिकाणी कोविड साठी ११० बेड आरक्षित असून ही बेड संख्या २७० पर्यंत वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय प्रमुखांशी चर्चा केली असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिंदुजा रुग्णालयात ९३ बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित असून बेड वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय प्रमुखांशी चर्चा केली. ज्या रुग्णांना खऱ्या अर्थाने ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे, त्या रूग्णांना ते बेड मिळाले पाहिजे, हा या भेटीमागे खरा उद्देश असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच रुग्णालयातील शौचालयांचे दिवसांतून पाच ते सात वेळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाबाधित असलेले परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या सीसी १ वन व सीसी - २ सेंटरमध्ये उपचार घ्यावा, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. त्यासोबतच कोविड रुग्णांनी थेट रुग्णालयात दाखल न होता रुग्णांची रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील वाँररूममधूनच झाली पाहिजे, असे महापौरांनी सांगितले. त्यानंतर महापौरांनी वरळीच्या नेहरू सायन्स सेंटर याठिकाणी नव्याने १५० रुग्णशय्येचे कोविड समर्पित रुग्णालय तयार होत असून या कामाची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी केली. त्यानंतर वरळीच्या पोद्दार रुग्णालयात नव्याने १९३ बेड सीसी -१ तसेच सीसी - २ अंतर्गत तयार करण्यात आले असून या कामाची पाहणीही महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली.
याप्रसंगी जी / दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.
******
टिप्पणी पोस्ट करा