मुंबई : बोरिवली (पूर्व ) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज दि. १२ मे २०२१ रोजी बोरिवली (पूर्व ) च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात पार पडले.
याप्रसंगी आमदार विलास पोतनीस, आर /मध्य व आर/ उत्तर विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेवक विद्यार्थी सिंह, उप आयुक्त (परिमंडळ -७). विश्वास शंकरवार, आर /मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप जाधव, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पहुरकर तसेच रुग्णालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे महापौरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ११ माळ्यांचे १०५ बेड क्षमतेचे असलेले हे रुग्णालय लवकरच १५० बेड क्षमतेचे होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विभागाव्यतिरिक्त याठिकाणी नव्याने नेत्ररोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात शिशु विभाग, अपघात विभाग या सर्व प्रकारच्या सुविधा या रुग्णालयात उपलब्ध होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. येथील नागरिकांसाठी एक चांगली आरोग्य सुविधा याठिकाणी उपलब्ध झाली असून आज जागतिक परिचारिका दिन असून या दिवशी नवीन रुग्णालयाचे लोकार्पण होत आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. रुग्णांची सुश्रुषा करणाऱ्या उत्कृष्ट परिचारिकांना गौरविण्याचा आजचा हा दिवस आहे. आरोग्य विभागाचा कणा असलेल्या परिचारिकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे महापौरांनी सांगितले. आपले कुटूंबबाधित होऊनही आपण न डगमगता ताठ मानेने रुग्णांची सेवा करीत आहात, ही खूप मोठी बाब असल्याचे महापौरांनी सांगितले.
****
टिप्पणी पोस्ट करा