मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या आहेत. त्यांनी आज आपल्या दौऱ्याची सुरूवात करण्या अगोदर श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या अनेक महत्वपूर्ण भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील त्या उद्या भेटणार आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्या भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नाही. म्हणून आज राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना भेटीबाबत माहिती दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील वेळी ममता बॅनर्जी जेव्हा मुंबईत आल्या होत्या, तेव्हा देखील त्यांची भेट घेतली होती. एक मैत्रीचं जे नातं आहे, ते वेगळं आहे. तेच वाढवण्यासाठी त्या जेव्हा मुंबईत येता तेव्हा त्यांचं स्वागत करणं स्वाभाविक आहे. आज आम्ही केवळ त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, अनेक विषयांवर चर्चा झाली. परंतु त्या मुंबईत आलेल्या आहेत तर आम्ही त्याचं इथे येऊन स्वागत केलं.”असंही आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा