(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू | मराठी १ नंबर बातम्या

लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू



 *कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत चौथ्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर*

*एकूण २८१ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ७५ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे २५ टक्के रुग्ण*

*संकलित नमुन्यांमध्ये लसीकरण झालेल्यांपैकी एकाचाही मृत्यू नाही*

*लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू*

*कोविड प्रतिबंधक लस घेणे, निर्देशांचे कठोर पालन आवश्यक असल्याचे अधोरेखित*

मुंबई : कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर तीन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. तिसऱ्या तुकडीमध्ये मुंबईतील एकूण २८१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ७५  टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे २५ टक्के रुग्ण आढळले आहेत. २८१ पैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून या चारही जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता. तसेच त्यांचे वयदेखील ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तर लस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  

चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे देखील आवश्यक आहे, हे वारंवार अधोरेखित होत आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये चौथ्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३४५ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २८१ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २८१ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत. 

मुंबईतील २८१ रुग्णांपैकी २६ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ८५ रुग्ण (३० टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९६ रूग्ण (३४ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ६६ रुग्ण (२३ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ८ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.

चाचणीतील निष्कर्षानुसार, २८१ पैकी २१० रुग्ण (७५ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ७१ रुग्ण (२५ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह विषाणू संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, या २८१ पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त ८ जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. तसेच कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.

याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या ६९ नागरिकांना बाधा झाली. त्यातील १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तिघांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर चार जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले चारही रुग्ण ६० वर्ष वयांवरील वयोवृद्ध होते. यातील दोघांना दीर्घकालीन आजार होते. तर अन्य दोघांना कोणतेही आजार नव्हते. या चौघा रुग्णांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. हे चारही रुग्ण कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर २ ते ५ दिवसांच्या विलंबाने रुग्णालयात दाखल झाले. ते देखील त्यांच्या जीवावर बेतले. 

याचाच अर्थ, कोविड लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. तर लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. 

वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण २८१ रुग्णांपैकी १९ जण या वयोगटात मोडतात. पैकी ११ जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ आणि ८ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित (validation) होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करु शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून यापूर्वी सर्वप्रथम दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी दुसऱ्यांदा तर दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी तिसऱ्यांदा कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे महानगरपालिका आरोग्य प्रशासनाला शक्य झाले आहे.

कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचण्यांचे निष्कर्ष पाहता असे लक्षात येते की, सर्व पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे देखील कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मुखपट्टी (मास्क) चा योग्य उपयोग करावा. सार्वजनिक स्थळी सुरक्षित अंतर राखावे. गर्दी टाळावी. हातांची नियमित स्वच्छता राखावी. या सर्व बाबी प्रत्येकाने पाळाव्यात, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget