मुंबई (दि 7 नोव्हें): पु. ल. देशपांडे यांच्या जयंती दिनानिमित्त पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत "पु ल कला महोत्सवाचे" आयोजन केले असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. यामध्ये नाट्य, चित्रपट, शास्त्रीय संगीत, आदिवासी कला, कविता सादरीकरण, लोककला, परिसंवाद, चर्चा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पु ल कला महोत्सवाचे उद्घाटन ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता होणार असून, सांगता समारंभ दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच कोविड पश्चात मुलांची मानसिकता, मोबाईल मुक्ती आणि मुलांसाठी नवीन खेळ अशा कार्यक्रमांचेही आयोजन यामध्ये करण्यात आलेले आहे. राज्यातील चंद्रपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई अशा विविध ठिकाणच्या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.
पुलं महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे निशुल्क असून यासाठी प्रेक्षकांना प्रथम पास घ्यावे लागणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय मुंबई व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हे पास उपलब्ध असून "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" हे तत्व अवलंबिले जाईल. कोरोना पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी नियम पाळणे आवश्यक असून मास्क व सॅनिटायझर यांचा वापर अनिवार्य आहे.
सदर महोत्सवादरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा