(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कॅनडाच्या उच्च आयुक्तांची महानगरपालिका मुख्यालयास भेट | मराठी १ नंबर बातम्या

कॅनडाच्या उच्च आयुक्तांची महानगरपालिका मुख्यालयास भेट



मुंबई : कॅनडाच्या भारतातील उच्च आयुक्त (प्रभारी) श्रीमती ऍमंडा स्ट्रोहान यांच्यासह उच्च आयुक्तालयातील शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास आज (दिनांक २४ नोव्हेंबर २०२१) दुपारी भेट दिली. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांची या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षाची आणि पालिका मुख्यालय इमारत ऐतिहासिक वारशाची देखील पाहणी केली. 

उच्च आयुक्त श्रीमती स्ट्रोहान यांच्यासमवेत कॅनडाचे भारतीय उच्च आयुक्तलयातील राजकीय, आर्थिक व नागरी विषयांचे दूत श्री. मायकेल वाँक, दूताधिकारी श्रीमती लॉरेटो मॅककूल, अधिकारी श्री. झुबिन, संवाद अधिकारी श्रीमती जयिता फुलसुंगे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. 


प्रारंभी, महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. कोविड संसर्ग परिस्थितीमध्ये कॅनडाने केलेल्या कामगिरीविषयी श्रीमती स्ट्रोहान यांनी तर मुंबईतील प्रयत्नांविषयी श्री. चहल यांनी माहिती दिली. पटियाला (पंजाब) येथील थापर इन्स्टीट्युटने श्री. चहल यांना नुकतीच डॉक्टरेट प्रदान केली आहे. त्याबद्दल श्रीमती स्ट्रोहान यांनी आयुक्तांचे विशेष अभिनंदन केले. मुंबई महानगरासमवेत व्यापार, वाणिज्य, सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासह इतर विषयांवर देखील मान्यवरांनी चर्चा केली. 

यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय कन्यादिन निमित्ताने महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर गुलाबी रंगाची विद्युत रोषणाई करुन जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल श्रीमती स्ट्रोहान यांनी विशेष आभार मानले. मुंबई महानगरात प्रगतिपथावर असलेल्या सागरी किनारा रस्त्यासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत श्रीमती भिडे यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.  

    

यानंतर आपत्कालीन नियंत्रण कक्षाची शिष्टमंडळाने पाहणी केली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर यांनी मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन, नियोजन, अंमलबजावणी या संदर्भात विविध महत्त्वाच्या घटनांचे दाखले देत सविस्तर माहिती दिली. अद्ययावत आणि सुसज्ज नियंत्रण कक्ष पाहून तसेच मुंबई महानगरात आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही जाणून घेतल्यानंतर शिष्टमंडळ प्रभावित झाले.


भेटीच्या अखेरच्या टप्प्यात महानगरपालिका मुख्यालय ऐतिहासिक इमारतीचे वारसा दर्शन (हेरिटेज वॉक) करण्यात आले. महानगरपालिका सभागृह आणि प्रवेशद्वार क्रमांक २ जवळील अंतर्गत सोनेरी घुमट पाहून सदर शिष्टमंडळ भारावून गेले. महानगरपालिका सभागृहात भेटीप्रसंगी श्रीमती स्ट्रोहान यांनी सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत यांच्याशी संवाद साधला. महानगरपालिका मुख्यालयाची इमारत महानगरपालिकेच्या कामकाजाचा आणि मुंबई शहराचा दैदिप्यमान वारसा सांगणारी आहे, असे नमूद करुन श्रीमती स्ट्रोहान यांनी प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुकही केले.   

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget