_१४ नोव्हेंबर २०२१ - जागतिक मधुमेह दिनानिमित्त_
*जागतिक मधुमेह दिनानिमित्त विशेष भित्तीपत्रकाचे प्रकाशन
*३० वर्षावरील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा मधुमेह चाचणी करण्याचे आवाहन
मुंबई : “मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करा. यामध्ये प्रामुख्याने नियमित व वेळेवर सुयोग्य आहार घेणे, मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार दररोज ठरलेल्या वेळी व्यायाम करणे, पायी चालणे, सायकल चालविणे यासह पुरेशी झोप घेणे, यासारख्या बाबींचा समावेश वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा. त्याचबरोबर ३० वर्षावरील सर्वांनी वर्षातून किमान एकदा आपली मधुमेह चाचणी करवून घ्यावी”, असे मार्गदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी आज केले. ते आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमा दरम्यान मधुमेह विषयक जनजागृतीपर एका विशेष भित्तीपत्रकाचे प्रकाशन सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
..
महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्यासह प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
...
या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, असंसर्गजन्य आजार नियंत्रणावर विशेष भर देऊन प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘कोविड - १९’ या संसर्गजन्य आजारामुळे होणार्या मृत्युंकरिता मधुमेह हा एक महत्त्वाचा जोखमीचा घटक असून नागरिकांनी वेळेत मधुमेहाचे निदान, रक्तातील साखरेचे नियंत्रित प्रमाण व जीवनशैलीतील बदल या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांचे ‘कोविड - १९’ लसीकरण झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित उपस्थितांशी संवाद साधताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आवाहन केले की, महापालिका दवाखान्यांमार्फत पुरविण्यात येणार्या आरोग्य सुविधांचा लाभ जास्तीत-जास्त मुंबईकरांनी घ्यावा. तसेच ३० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या सर्व व्यक्तिंनी वर्षातून किमान एकदा मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता आपली तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर सर्व कॉर्पोरेट कार्यालये आणि कामाची ठिकाणे यांनी आपल्या अधिनस्त कर्मचार्यांची मधुमेह व उच्च रक्तदाब यांकरिता तपासणी नियमितपणे करावी. तसेच कार्यालयीन कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करावा, असेही डॉ. गोमारे यांनी आवर्जून नमूद केले.
...
या कार्यक्रमादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील आहार तज्ज्ञ श्रीमती जयश्री परांजपे आणि के. ई. एम. रुग्णालयातील आहार तज्ज्ञ श्रीमती सफला महाडिक यांनी संगणकीय सादरीकरणासह दैनंदिन जीवनातील आरोग्यपूर्ण आहार कसा असावा ? आपल्या आहारामध्ये कोणत्या बाबी असाव्यात व कोणत्या बाबी टाळाव्यात ? याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देखील दिली.
...
याच कार्यक्रमादरम्यान उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शाह यांनी सांगितले की, महापालिका दवाखान्यांमध्ये उपचार घेणार्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबच्या रुग्णांकरिता भारतीय आहारतज्ञ संघटनेच्या मदतीने आहारतज्ञांमार्फत समुपदेशन सेवा प्रदान करण्यास दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच कुटुंब, शाळा आणि महाविद्यालयांतून सकस आहारविषयक सवयींस प्रोत्साहन देण्याबाबत देखील मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज आयोजित या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन हे डॉ. दक्षा शहा यांनी केले.
...
*जागतिक मधुमेह दिनानिमित्त आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रामुख्याने महानगरपालिका कर्मचा-यांसाठी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक घडामोडींचे वार्तांकन करणा-या प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी मधुमेह व रक्तदाब चाचणी शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची विविध रुग्णालये, दवाखाने, कार्यालये इत्यादी ठिकाणी देखील मधुमेह चाचणी करण्यात आली, अशीही माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.*
===
*बातमीबाबत अतिरिक्त माहिती*
👇
आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटना (IDF) यांच्याद्वारे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मधुमेह ऍटलास २०२१’ (दहावी आवृत्ती) अहवालानुसार, आपल्या देशातील २० ते ७९ या वयोगटातील अंदाजे ७.४ कोटी प्रौढ लोकसंख्या मधुमेहबाधित असून मधुमेहाच्या जागतिक क्रमवारीत भारत हा दुसर्या क्रमांकाचा देश आहे. तसेच मधुमेह आणि संबंधीत गुंतागुंतींमुळे देशात मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या अंदाजे ६.४ लाख इतकी आहे.
...
‘मृत्यूकारण वैद्यकीय प्रमाणिकरण अहवाल’ (भारत - २०१९) नुसार, महाराष्ट्रात मधुमेहामुळे मृत्यू पावणार्या व्यक्तींचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ९.८% इतके आहे. CRS व MCCD २०१९ नुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातिन सन २०१९ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी १२.६% मृत्यू मधुमेह आणि संबंधीत गुंतागुंतींमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. मधुमेह विशेषतः अनियंत्रित मधुमेह हा ‘कोविड - १९’ मुळे होणार्या मृत्युंकरिता एक महत्त्वाचा जोखमीचा घटक आहे. कोविडमुळे महापालिका क्षेत्रात मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांपैकी साधारणतः ३९% रुग्ण मधुमेही असल्याची बाब समोर आली आहे. कोविड संसर्गबाधित मधुमेही रुग्ण हे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकार इत्यादींनी ग्रस्त असल्यास त्यांना देण्यात येणार्या उपचारांची परिणमकारकता व संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण यावर मोठा परिणाम दिसून येतो.
...
‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’ (२०१९-२०) नुसार मुंबईतील १५ वर्षांवरील साधारणतः १७.५% व्यक्तींमध्ये रक्तातील निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक शर्करा प्रमाण आढळले आहे. मुंबईतील दर ५ पैकी १ प्रौढ व्यक्तीमध्ये रक्तशर्करेची पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असून ती पूर्वमधुमेह किंवा मधुमेहाच्या श्रेणीत गणली जाऊ शकते.
...
१४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिनाकरिता वर्ष २०२१-२३ साठी ‘Access to Diabetes Care’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या वर्षीच्या संकल्पनेस अनुसरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत दिनांक ११ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रतिबंधात्मक जीवनशैलीतील बदल- सकस आहार, नियमित व्यायाम, नियंत्रित वजन इत्यादी केंद्रित खालील नमूद विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत :
...
• *विशेष तपासणी शिबिरे :*
• आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात १ लाख तपासणी उद्दिष्टासह मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन
• सर्व उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये व बृहन्मुंबई महापालिका कार्यालयांतील कर्मचारी यांची तपासणी
• तपासणी शिबिरांदरम्यान आहारतज्ञांच्या मदतीने सकस व संतुलित आहाराचे महत्त्व सांगणा-या माहितीपर सत्रांचे आयोजन
• लघुउद्योग कामगार, फेरीवाले, रिक्षा व टॅक्सीचालक, महिला बचत गट सदस्य, युवक क्लब व मंडळांना केंद्रस्थानी ठेवून विशेष शिबिरांचे आयोजन
• बेस्ट कर्मचार्यांकरिता जीवनशैली व्यवस्थापनविषयक माहितीपर सत्रासह विशेष तपासणी शिबीर
..
• *मधुमेह प्रतिबंधाकरिता जनजागृती :*
पोस्टर वितरण, माहितीपर होर्डिंग्स, बेस्ट बस थांब्यांवर जाहिराती, रेडिओ संदेश, टी.व्ही जाहिराती आणि समाजमाध्यमांचा वापर याद्वारे जनजागृती करण्यात येईल.
...
• *महापालिका दवाखान्यांमध्ये पुरविण्यात येणार्या सुविधा :*
मधुमेहाचे निदान व उपचार सेवा नागरिकांना घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केवळ द्वितीय आणि तृतीय स्तरीय रुग्णालय स्तरावरच नव्हे, तर मनपा दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरदेखील मनुष्यबळ व पायाभूत सुविधा बळकटीकरणाचे प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहेत. महापालिका दवाखान्यांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्यविषयक विविध सेवा प्रदान करत आहे :
• मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांकरिता तपासणी व उपचार सेवा उपलब्ध
• मधुमेह रुग्णांसाठी महापालिका दवाखान्यांत आहारतज्ञ समुपदेशन सेवा
• अनियंत्रित मधुमेह रुग्णांना द्वितीय व तृतीय श्रेणी आरोग्यसंस्थाना संदर्भित करण्याकरिता संदर्भ सेवा
• *मुंबईच्या शहरी झोपडपट्टी क्षेत्रात राहणार्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांकरिता, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत व अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर जनजागृती, प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे जनसामान्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा NC-DISHAA या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.* ६ वॉर्ड क्षेत्रातील १८ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून १३ लक्ष लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ३६ हजार व्यक्तिंची तपासणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने मुंबईत या उपक्रमाचा विस्तार करण्याचा मानस आहे.
• नजीकच्या काळात सर्वंकष सेवा प्रदान करण्याहेतू विशेष असंसर्गजन्य रोग नियंत्रण क्लिनिक्सची स्थापना करण्याचे प्रयत्न
• WHO स्टेप्स सर्वेक्षण आणि मोबाईल फोन सर्वेक्षण सद्यस्थितीत राबविण्यात येत आहेत.
...
• *आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार :*
• लहान मुले आणि तरुणांमध्ये आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार आणि लठ्ठपणास प्रतिबंध करणेहेतू बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून कार्यवाही करणार
• कॉर्पोरेट कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, इतर कामाची ठिकाणे व कार्यालयीन व्यवस्थापनांनी आपल्या अधिनस्त कर्मचार्यांची नियमितपणे मधुमेह व उच्च रक्तदाब यांकरिता तपासणी करून घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे
• मधुमेह प्रतिबंध, वेळेत निदान आणि योग्य उपचार यांकरिता सर्व नागरिकांनी ABC या मंत्राचे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे :
A (Access) – मधुमेहासंबंधित काळजी व उपचार सेवांचा वेळेत उपयोग
B (Be Vigilant) – मधुमेह आणि त्याची लक्षणे उदा. खूप तहान व सतत भूक लागणे, वारंवार लघवीस होणे, अचानक वजनातील अनपेक्षित घट, थकवा / कमजोरी इ. व काही व्यक्तिंमध्ये ही
लक्षणे जाणवत नाहीत. मधुमेह शरीराच्या विविध अवयवांवर दुष्परिणाम करत असल्यामुळे मधुमेहाच्या गुंतागुंतींविषयी सावध राहणे व वेळेत उपचार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे हृदयविकारचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होणे, मज्जातंतूना इजा, पायाचे बरे न होणार्या जखमा (अल्सर), दृष्टीदोष आणि इतर संसर्ग होण्याची शक्यता असते.
C (Control) – नियमित वजन तपासणी आणि नियंत्रण, संतुलित आहाराचे सेवन, आहारातील साखर, मीठ व तेलाचे कमी प्रमाण, नियमित व्यायाम व ध्यानधारणेच्या माध्यमातून दैनंदिन ताणतणावाचे व्यवस्थापन करणे लाभदायक आहे. सर्व मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचारांनी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.
===
टिप्पणी पोस्ट करा