मुंबई, दि. 26 :- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता, अशी निर्भत्सनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुंबईवरील हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर, सबंध भारतीय मनोधैर्य एकवटले. वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निशस्त्र असतानाही क्रूरकर्मा दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळ्या झेलून, अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याचे, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल ते पुढच्या पिढ्यांमध्ये विकसित व्हावे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. हेच या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आणि निष्पाप बळींना अभिवादन ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
००००
मुंबई अतिरेकी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण
राज्यपाल, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली.
भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.
कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक संजय पाण्डे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.
००००
टिप्पणी पोस्ट करा