मुंबई,दि.१९ : जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती अंतर्गत समितीकडे प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा जलदगतीने निपटारा करावा तसेच अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती(अत्याचार प्रतिबंध)कायद्याचे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे असे आदेश मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले.
बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील समितीचे सदस्य अप्पर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर निलीमा धायगुडे , समाज कल्याण चे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे प्रतिबंधक) व नागरी हक्क संरक्षण व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे पदाधिकारी हजर होते
अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातंर्गत अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती काम करत आहे. समितीकडे प्रलंबित असलेल्या ७१ गुन्ह्यांचा गुन्हे निहाय आढावा घेण्यात आला. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करतांना अधिनियमातील व शासन निर्णयामध्ये दिलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करुन गुन्हे दाखल करावेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर ६० दिवसामध्ये त्यांचे दोषारोप मा. न्यायालयामध्ये दाखल करावे, व त्याचा अहवाल समितीस कळवावे.तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांची निर्गती जलदगतीने करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी बैठकीत केल्या.
टिप्पणी पोस्ट करा