मुंबई, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच ‘लेखक, भाषा आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रथमच अशा परिसंवादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
नाशिक येथे दिनांक 2 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यामध्ये मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. भारत निवडणूक आयोगाने हा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 5 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविला आहे. या कार्यक्रमांसंदर्भातील माहिती देण्यासाठी मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही सक्षम राहावी, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक असतो तो लेखक आणि त्याची लेखणी. लेखकाची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, मराठी भाषेच्या चळवळीतले प्रा.कौतिकराव ठाले पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पत्रकार आणि संपादक इब्राहीम अफगाण व दीप्ती राऊत, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार करणार आहेत. परिसंवाद Chief Electoral Officer या फेसबुक पानावरून आणि https://ceo.maharashtra.gov.
या संमेलनात मतदारांच्या जनजागृतीसंबंधी प्रकाशने आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळ यांचे दालनही असणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. ही व्यासपीठे शाळा महाविद्यालये, गाव-परिसर, कार्यालयांमध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकाही या दालनात उपलब्ध असेल. विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाहीसंबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत, असेही आवाहन श्री.देशपांडे यांनी केले आहे.
या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात आजमितीस 70 टक्के अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून या नोंदणीत तरुणांचा मोठा सहभाग आहे. संपूर्ण राज्यातून एकूण 13 लाख अर्ज प्राप्त झाले यात 7 लाख 86 हजार नवमतदार नोंदणीसाठी, मयत किंवा स्थलांतरित झालेले 1 लाख अर्ज तर नावात किंवा पत्त्यात बदल असे 90 हजार अर्ज प्राप्त झाले असल्याची माहितीही श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.
000
टिप्पणी पोस्ट करा