मुंबई, दि. 23 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मंदिराच्या पावन नगरीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून व परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तुळजापूर तालुक्यातील हंगरग तूळ येथील डान्सबार रात्री उशिरापर्यंत चालू होते त्याठिकाणी विभित्स नृत्य व विदेशी दारू रात्रभर विकली जात होती. या ठिकाणी या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून 64 जणांना ताब्यात घेतले असून त्याप्रकरणी 92 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच त्या डान्सबारचा परवाना रद्द करण्यात आला असून नृत्य परवाना रद्दची नोटीस पाठविण्यात आली आहे, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना सांगितले.
सदस्य अमोल मिटकरी यांनी तुळजापूर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी मंदिराच्या पावननगरीमध्ये वाईट प्रवृत्तींच्या लोकांकडून स्वत:च्या स्वार्थापोटी घाणेरडे प्रकार व डान्सबार रात्री उशिरापर्यंत सुरु असणे याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी श्री.देसाई बोलत होते.
या गुन्ह्यात छापा टाकून केलेल्या कार्यवाही दरम्यान आस्थापनाधारक व ग्राहक यांचेकडून एकूण 1 लाख ३८ हजार ०९० रुपयाची विदेशी दारु व बिअरचा ३ लाख २० हजार ४१० रुपयांचा मद्य साठा, १७ चार चाकी, ०५ दुचाकी वाहने व साऊंड सिस्टम १ लाख ०६ हजार रुपये असा एकूण किंमत १ कोटी २१ लाख ८३ हजार ५०० रुपये इतक्या रकमेचा ऐवज मिळून आलेला आहे. आस्थापनाधारक यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने परवाना रद्द करण्याच्या अनुषंगाने परवाना निलंबित का करण्यात येऊ नये याबाबत दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी आस्थापनेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत आस्थापनाधारक यांचे लेखी उत्तर प्राप्त होताच निलंबनाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. सद्यस्थितीत तुळजापूर शहरामध्ये एकही अनधिकृत डान्सबार व अनधिकृत बार नसून जुगार व अवैध दारुबंदी या सदराखाली अवैध धंदे यांना आळा घालून वेळीच कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
००००
टिप्पणी पोस्ट करा