मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गृहनिर्माण संस्था मतदारसंघात अखेर भगवा फडकला आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत व शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गृहनिर्माण संस्थेच्या मतदारसंघात बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेच्या मतदारसंघात शिवसेनेने यंदाही आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सुनील राऊत व अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेच्या संचालकपदी कार्यरत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यांच्या निवडणुकीचे विविध सहकारी व गृहनिर्माण संस्थांनी स्वागत केले आहे. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असा आत्मविश्वास संचालक अभिषेक घोसाळकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच गृहनिर्माण संस्थाचे प्रश्न व समस्या शासन दरबारी सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. बँकेचे ठेवीदार व सभासद यांच्या विश्वासाला तडा दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.तसेच
स्वयं पुनर्विकास योजनेला चालना देऊन गृहनिर्माण संस्था सभासदांना बँकेतर्फे सहकार्य करणार असल्याचे घोसाळकर सांगितले. मुख्य निवडणुक अधिकारी कैलास जेवले यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .त्यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा