(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग उड्डाणपुलावरील वस्तुंची चोरी | मराठी १ नंबर बातम्या

घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग उड्डाणपुलावरील वस्तुंची चोरी



*महानगरपालिका प्रशासनाकडून देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल* 

मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावरील दुभाजकाचे स्टड पोस्ट आणि इतर सुट्या भागांची वारंवार चोरी होत असून त्या संदर्भात अखेर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सुमारे १ लाख ८३ हजार रुपये किमतींच्या वस्तुंची चोरी झाली असून त्याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सहायक अभियंता (पूल) श्री. ज्ञानेश्वर दगडू उकिर्डे यांनी देवनार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) वर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले आणि हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०२१ पासून दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत या पुलावरील लोखंडी दुभाजकाचे जवळपास २०० स्टड पोस्ट आतापर्यंत चोरीस गेले आहेत. प्रत्येक स्टड पोस्ट हे अडीच फूट उंचीचे आहे. त्याची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. यासोबत १२ इंच जाडीचे लोखंडी क्रॅश बॅरीअर (किंमत सुमारे ३० हजार रुपये), १२ मीटर लांब आणि १० इंच रुंदीचे लोखंडी हाईट बॅरीअर (किंमत सुमारे ३० हजार रुपये), सुमारे ३०० नग लोखंडी नटबोल्ट (किंमत सुमारे ३ हजार रुपये) इत्यादी विविध सुटे भागदेखील चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. 

दरम्यान, या उड्डाणपुलावरील वाहनांची वर्दळ आणि सुट्या भागांची होत असलेली चोरी या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मुंबई पोलिस वाहतूक शाखेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीडोमीटर लावण्याची विनंती महानगरपालिका प्रशासनाने या पत्रांद्वारे पोलिसांकडे केली आहे.       

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget